एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कोरोना पाठोपाठ आता झिका व्हायरस चा शिरकाव! विशिष्ट डास चावल्याने होतो झिका..जाणून घ्या सर्वकाही

कोरोनाच्या संकटाशी सामना करत असतानाच झिका व्हायरसने (zika virus) भारतात शिरकाव केल्याची घटना समोर आली आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम येथील एका २४ वर्षीय गर्भवती महिलेला या विषाणूची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. ही महिला सर्दी, ताप आणि शरीरावर लाल पट्टे उठत असल्यामुळे दवाखान्यात भरती झाली होती.

तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या रक्ताचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये पाठवण्यात आले. त्यावेळी त्या महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या या महिलेने एका मुलाला जन्म दिला असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. या महिलेने बाहेर कुठे प्रवास केलेला नसला तरी तिचे घर तामिळनाडूच्या सीमेवर आहे. आठवड्याभरापूर्वी तिच्या आईला देखील तशीच लक्षणे दिसली होती. केरळ राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी गुरुवारी (८ जुलै) ही माहिती दिली.

तिरुअनंतपुरममध्ये सध्या या विषाणूचे अजून चौदा संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) कडे पाठवण्यात आले असून सरकार या टेस्ट्सच्या निकालाची वाट पहात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तिरुअनंतपुरम कडून एनआयव्ही ला पाठवण्यात आलेल्या १९ नमुन्यांपैकी डॉक्टरसह १३ कर्मचाऱ्यांना झिका विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे.

काय आहे झिका व्हायरस? कसा होतो प्रसार?
झिका व्हायरस (Zika Virus) हा एडीस (Aedes) या डासांच्या चावण्यातून पसरतो. एडीस डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप असे आजारही होतात. १९४७ मध्ये आफ्रिकेतील युगांडामधील माकडांमध्ये झिका व्हायरसची लागण झाल्याचे पहिल्यांदा आढळून आले. १९५२ मध्ये या विषाणूची लक्षणे माणसांमध्येही दिसू लागली.

लक्षणे:
झिकाची लक्षणे डेंग्यू सारखीच असली तरी तुलनेने ती सौम्य असतात. या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ताप, अंगावर लाल चट्टे किंवा पुरळ उठणे, सांधेदुखी, डोळे लाल होणे, डोकेदुखी आणि अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे साधारण दोन ते सात दिवस राहतात. बऱ्याच वेळा झिकाच्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत.

गर्भवती महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्यास गर्भालाही या विषाणूपासून धोका उत्पन्न होतो. वयस्कर माणसे व लहान मुलांनादेखील या विषाणूमुळे मज्जातंतूविषयक आजार उद्भवू शकतात. या विषाणूचा प्रसार सर्वसाधारणपणे उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय क्षेत्रांत होतो. एडीस डास हे सहसा सकाळी व संध्याकाळच्या वेळी आढळून येतात. जगातील ८६ देशांमध्ये अशा प्रकारचे डास आढळतात.

उपचार:
सद्यस्थितीत या विषाणूवर कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यावर सध्या संशोधन चालू आहे. डासांपासून लांब राहणे, भरपूर विश्रांती घेणे, द्रव पदार्थांचे सेवन करणे आणि सामान्य औषधांनी वेदना आणि तापावर नियंत्रण मिळवणे हे उपाय सध्याच्या घडीला संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य एजन्सीने सांगितले आहेत.

You might also like