एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बेघर होऊनही मानली नाही हार! स्वतःच्या हिंमतीवर बनली लखपती…

गावाकडच्या स्त्रीने केला शून्यातून लाखोंपर्यंतचा बिझनेस..

हिंमत असेल, काही करून दाखवण्याची धमक असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. ही गोष्ट खरी करून दाखवली आहे वैशाली बाळासाहेब घुगे या महिलेने. तिने निवडलेला व्यवसाय बघून लोक तिच्यावर हसले, पण तिने हार नाही मानली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील आंदूर गावची ही एक सामान्य महिला. आज ती आपल्या व्यवसायातून लाखो रुपये कमवते आहे.

नववी झाल्यावर शिकलेला मुलगा बघून वडिलांनी वैशालीचे लग्न लावून दिले. मुलगा शिकलेला आहे म्हटल्यावर पुढे नोकरी करेल आणि आपल्या मुलीला सुखी ठेवेल अशी त्या बापाची भाबडी आशा. सासरी वैशालीचे २० माणसांचे कुटुंब. नवऱ्याला नोकरी तर लागलीच नाही, उलट तो व्य’स’नाच्या आहारी गेला. त्यामुळे कुटुंबात वा’द वाढले. वैशाली आणि तिच्या नवऱ्याला कुटुंबातून वेगळं काढण्यात आलं.

नवरा आणि मुलांची जबाबदारी आता वैशालीवर येऊन पडली. दा’रु’ड्या नवऱ्याचा त्रा’स, त्यात माहेरची परिस्थितीही बरी नाही. यातच नवऱ्याच्या नोकरीसाठी पुढे वैशालीचे कुटुंब पुण्याला आले. वैशालीने हडपसरला तीन वर्षे नर्सरीमध्ये नोकरी केली. मात्र दोघांचाही पगार पुरेनासा झाल्यावर सगळे गावाकडे परतले. पत्र्याचं घर करून राहू लागले. सासू-सासऱ्यांनी एक म्हैस दिली होती. आपल्या वाट्याला आलेल्या शेतात वैशालीने भाजीपाला घेऊन विकायला सुरुवात केली.

एका शिक्षकाच्या पत्नीने तिला बचतगटात दरमहा ५० रुपये टाकण्याचा सल्ला दिला. बचतगटातून ५००० रुपये घेऊन वैशालीने दोन खोल्यांचे घर बांधले. पुढे स्वयंशिक्षण संस्थेबरोबर जोडली गेल्यावर तिने शेतीशी निगडीत व्यवसायांचं प्रशिक्षण घेतलं. शेती कमी असल्याने शेतीपूरक व्यवसायांकडे वळण्याचा निर्णय वैशालीने घेतला. एका म्हशीच्या दुधापासून दुग्धव्यवसायाला सुरुवात केली. गांडूळखताची निर्मिती सुरू केली. या खताच्या साहाय्याने २०१३-१४ च्या दुष्काळातही तिने केसरी आंब्यांची झाडे लावून जगवली.

पहिल्यांदा जेव्हा तिने गांडूळखत चाळून पोत्यात भरलं, तेव्हा ‘खत कुणी किलोवर विकतं का?’ असं म्हणत लोकांनी तिची चेष्टा केली. पण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करत स्वतःच्या शेतात गांडूळखत वापरून १० जनावरांचं संगोपन केलं. दुष्काळातही उत्तम शेती करून दाखवली. वैशालीची ही यशोगाथा ‘ऍग्रोवन’ मध्ये छापून आली. महाराष्ट्रभर तिच्या यशाचा डंका वाजला.

आज तिच्या शेतात एका वेळी १० टन गांडूळखत तयार होतं. वर्षभरात याच्या विक्रीतून वैशाली पाच लाख निव्वळ नफा कमावते. सोबत कुक्कुटपालनाचा छोटेखानी व्यवसायही सुरू केला आहे. इतर महिलांना काम मिळावे म्हणून पापड लाटण्याचे आणि डाळ बनवण्याचे काम दिले. कधीकाळी बेघर झालेल्या वैशालीने आता आपल्या नव्या घरात एका वेळी ५० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देता येईल इतका मोठा ट्रेनिंग हॉल बनवला आहे.

You might also like