एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर! शुभम कुमार देशात प्रथम…

यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यूपीएससी च्या नागरी सेवा २०२० च्या या परीक्षेत बिहारचा शुभम कुमार देशात पहिला आला आहे. या परीक्षेत जागृती अवस्थीने दुसरा क्रमांक पटकावला असून अंकिता जैन तिसऱ्या क्रमांकावर आहे. यश जालुका आणि ममता यादव अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

नागरी सेवा परीक्षा २०२० मध्ये एकूण ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी ५४५ पुरुष तर २६१ महिला आहेत. जानेवारी २०२१ मध्ये लेखी परीक्षा तर ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ दरम्यान मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यातून २६३ जनरल, ८६ ईडब्लूएस, २२९ ओबीसी, १२२ एससी, ६१ एसटी असे एकूण ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले. त्यापैकी ११८ आयएएस, ३६ आयएफएस, २०० आयपीएस, ३०२ अ गटातील केंद्रीय प्रशासकीय सेवेत, तर ११८ ब गटातील केंद्रीय प्रशासकीय सेवेत असणार आहेत.

सध्या आयएएस अधिकारी असलेल्या आणि २०१५ च्या बॅचच्या टॉपर टीना डाबी यांची बहीण रिया डाबी यांनीही या परीक्षेत उत्तीर्ण होत १५ वा क्रमांक मिळवला आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं यश

पुण्यातील अंध विद्यार्थिनी पूजा कदम ५७७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
२१ वर्षांची नितीशा जगताप पहिल्या प्रयत्नातच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत १९९ व्या रँकवर आहे. कालच तिची दिल्लीत मुलाखत झाली आणि आज निकाल लागला. त्यामुळे ती अजूनही दिल्लीतच आहे. मूळच्या लातूरच्या असलेल्या नितीशाने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतलं आहे.

लातूरचा निलेश गायकवाड देशात ६२९ वा आला आहे. गेल्या वर्षी दिलेल्या यूपीएससीच्या परीक्षेत तो ७५२ रँकवर होता. सध्या तो संरक्षण सहाय्यक नियंत्रकपदी नियुक्त झाला असून पुण्यात त्याचे प्रशिक्षण सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथी शुभम पांडुरंग जाधव याने ४४५ वी रँक, तर लातूरच्या कमलकिशोर कांदरकरने १३७ वी रँक मिळवत या परीक्षेत यश मिळवलं आहे.
यवतमाळच्या दर्शन दुगडने १३८ वे, तर जालन्याच्या अभिजीत वेकोसने ५०१ वे स्थान मिळवले आहे.

कराड तालुक्यातील आणे गावच्या तुषार देसाईने २२४ वी रँक मिळवली आहे. सध्या तो भोपाळमध्ये (मध्य प्रदेश) नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहे. कराडमधील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यावर पुण्याच्या सीईओपी कॉलेजमध्ये इंजिनीयरिंग पूर्ण केले. तुषारचे वडील उत्तमराव देसाई कराडच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागात शाखा अभियंता आहेत. दोन वर्षांपूर्वी यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या तुषारचा मावस भाऊ गिरीश यादवची तामिळनाडूच्या केडरमध्ये त्याची पोलीस अधिक्षक म्हणून निवड झाली असून सध्या त्याचे प्रशिक्षण सुरू आहे.

You might also like