एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बाळूमामाच्या नावानं..’ फेम अभिनेता सुमित पुसावळे यांची चाहत्यांच्या प्रश्नांना धमाल उत्तरे! मानधन, आवडते गायक आणि बरंच काही..

कलर्स मराठी वर सुरू असलेली ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही पौराणिक मालिका प्रेक्षक अगदी श्रद्धेनं बघतात. ही मालिका संत बाळूमामा यांच्या आयुष्यावर बेतली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये संत बाळूमामा यांचे भक्त आहेत. बाळूमामांचा जन्म कर्नाटकातल्या बेळगावात झाला. धनगर समाजात जन्माला आलेले बाळूमामा मेंढपाळ होते. त्यांनी आपले सर्व आयुष्य लोकांना मदत करण्यासाठी समर्पित केले होते.

अशा पौराणिक मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांनाही लोक तितकेच मानतात आणि तितक्याच श्रद्धेनं त्यांना पूजतात देखील. २०१८ ला सुरू झालेली ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिकाही त्याला अपवाद नाही. या मालिकेत बाळूमामांचे काम करणाऱ्या कलाकाराबद्दल देखील प्रेक्षकांना तेवढीच आपुलकी वाटते.

या मालिकेत मध्यवर्ती भूमिका निभावणाऱ्या कलाकाराचे नाव आहे सुमित पुसावळे. सुमित अतिशय मन लावून ही भूमिका निभावली आहे. त्यामुळे अर्थातच तो प्रेक्षकांचा लाडका आहे.

अशा या आपल्या लाडक्या अभिनेत्याबद्दल जाणून घेण्यात प्रेक्षकांना आणि विशेषतः सुमितच्या चाहत्यांना खूपच रस आहे. सुमित पुसावळे सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक. आपले अनेक फोटो तो सोशल मीडिया वर शेअर करत असतो. त्यावर कधी कधी छान छान सुविचारही तो टाकत असतो. नुकतेच त्याच्या चाहत्यांनी त्याला वेगवगळे प्रश्न विचारले. सुमितने काही प्रश्नांना अत्यंत प्रामाणिकपणे उत्तरे दिली तर काही प्रश्नांची उत्तरे शिताफीने टाळली.

एका चाहत्याने त्याला ‘मराठी बिग बॉस मध्ये काम करायला आवडेल का’ असे विचारले असता त्यावर सुमितने प्रश्नार्थक चेहऱ्याचा फोटो फक्त शेअर केला. एका चाहत्याने सुमितला त्याचे आवडते गायक विचारले. त्यावर त्याने “माझे आवडते गायक सोनू निगम, मोहम्मद रफी, अभिजीत भट्टाचार्य, कैलाश खेर, अरिजित सिंग हे आहेत” असे सांगितले. एका चाहत्याच्या “मुंबईला चित्रीकरण कधी होणार” या प्रश्नावर थोडे मोघम उत्तर देत सुमित म्हणाला, “इतनी खुशी कभी नहीं होगी”.

एका चाहत्याने सुमितला त्याच्या शाळेबद्दल विचारले. त्यावेळी सुमितने आपली शाळा दिघंची हायस्कूल, दिघंची असल्याचे सांगितले. समस्त महिलावर्गाला पडलेला प्रश्न एका चाहत्याने विचारला- “जोडीदाराबद्दल काय मत आहे?” त्यावर सुमितने प्रामाणिकपणे “शोध सुरू आहे” असे सांगितले. एका चाहत्याने त्याला त्याच्या पहिल्या मोठ्या स्वप्नाबद्दल विचारले.

त्यावर त्याने सांगितले, “माझं पहिलं मोठं स्वप्न हे वकील बनायचं होतं. मात्र मला अभ्यासक्रम झेपला नाही. त्यामुळे मधेच मी वकील बनण्याचे स्वप्न सोडून दिले.” एका चाहत्याने विचारलेल्या “तुला दिवसाला मानधन किती मिळते” या प्रश्नावर त्याने “दोन वेळचे पोटभर तेवढे जेवण मिळते” असे उत्तर दिले.

You might also like