एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बिग बॉस मराठी ३’ मधून या कारणामुळे शिवलीला पाटीलने घेतला बाहेर पडण्याचा निर्णय, स्पर्धकांना झाले दुःख अनावर..

कलर्स मराठी वरील ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ च्या ‘बिग बॉसची चावडी’ सदरामुळे प्रेक्षकांचे बरेच मनोरंजन झाले आहे. या शो चे होस्ट महेश मांजरेकर यांनी अनेकांना खडे बोल सुनावले, तर काहींना काही गोष्टी समजावून देखील सांगितल्या. स्पर्धकांच्या चुका त्यांनी बरोबर दाखवून दिल्या. याचबरोबर स्पर्धकांना एक आश्चर्याचा धक्का देखील दिला आहे.

काही दिवसांपूर्वी स्पर्धक शिवलीला पाटील हिची तब्येत बिघडली होती. औषधे घेऊन देखील तिला बरे वाटत नव्हते. त्यामुळे बिग बॉसने तिला काही काळ घराबाहेर राहून उपचार घेण्यास सांगितले होते. आपल्या तब्येतीच्या कारणासाठी ती बिग बॉसच्या घरातून काही काळासाठी बाहेर पडली होती. मात्र तिचा एक व्हिडिओ नुकताच बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धकांना दाखवण्यात आला. तो पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला, तर बऱ्याच स्पर्धकांचे डोळे पाणावले.

या व्हिडिओ मध्ये शिवलीला हॉस्पिटलच्या बेडवरून बोलत होती. तिने यावेळी ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. तिने सांगितले, की बिग बॉसच्या घरात आल्यानंतर तिची तब्येत बिघडली. यावेळी इतर स्पर्धकांनी तिची खूप काळजी घेतली. त्याबद्दल तिने सगळ्या स्पर्धकांचे आभार मानले. तसेच बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी आणि घरातील पुढील टास्क खेळण्यासाठी हवी असणारी शारीरिक शक्ती तिच्यात नसल्याने तिने या शो मधून माघार घेतल्याचेही सांगितले.

शिवलीलाची तब्येत अजूनही बरी नसल्याने ती या शो मध्ये आता दिसणार नाही. महेश मांजरेकरांनी तिला या शो मध्ये सहभागी व्हायचा विश्वास दिला होता आणि तिला तो विश्वास टिकवता आला नाही याचे तिला खूप वाईट वाटले आहे, असे तिने यावेळी सांगितले. तसेच तिने सर्व स्पर्धकांना पुढील खेळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह, सुरेख कुडची या स्पर्धकांबरोबर तिची छान गट्टी जमली होती, असेही शिवलीलाने यावेळी सांगितले. या स्पर्धकांना हे ऐकून अश्रू अनावर झाले. विशालने यावर नंतर आपले मत व्यक्त करताना सांगितले, “ती असायला हवी होती, खूप काही शिकवून गेली. तिने जो विश्वास दाखवला आहे आपल्यावर तो कधी नाही मोडणार. ते असतं ना, काही माणसं दोन दिवस आयुष्यात येतात आणि आयुष्यभराची जागा करून जातात, त्यातली ती आहे…” मीनलने देखील सांगितले, “ती कशी होती आपल्यालाच माहिती आहे… तिच्यासारखी मुलगी मी नाही बघितली कधीच. तिला इतकं नॉलेज आहे, तिच्यासमोर कोणीच काही नाहीये.”

You might also like