एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बिग बॉस मराठी ३: जाणून घ्या बिग बॉस च्या घरातील कीर्तनकार शिवलीला पाटील बद्दल खास गोष्टी..

कलर्स मराठी वाहिनी वर सुरू झालेला ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ हा रिऍलिटी शो सुरुवातीपासूनच बऱ्याच कारणांनी चर्चेत राहिला आहे. या शो मध्ये चित्रपटसृष्टीतील काही चेहऱ्यांबरोबरच सामाजिक जीवनातील काही व्यक्तिमत्वांचाही समावेश असतो. यंदाच्या पर्वातही अशी काही व्यक्तिमत्वं बिग बॉस च्या घरात आली आहेत. या लोकांबद्दल अर्थातच प्रेक्षकांना कुतूहल आहे. हे लोक चित्रपटसृष्टीतील कलाकारांबरोबर बिग बॉस च्या घरात राहू शकतील का? आणि राहिलेच, तर ते कसे राहतील? कसे वागतील? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत.

या सामाजिक व्यक्तिमत्वांतील एक व्यक्ती म्हणजे कीर्तनकार शिवलीला पाटील. एक कीर्तनकार बिग बॉस च्या घरात येणार म्हटल्यावर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या होत्या. त्यामुळे शिवलीला बद्दल जाणून घेण्याची ओढ प्रेक्षकांना लागून राहिली आहे. अर्थात तिच्या बिग बॉस च्या घरातील प्रवेशाला अनेकांनी विरोध दर्शवला आहे. तिच्या घरच्यांचाही यासाठी विरोध होता. पण आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर आपण हा शो करू शकतो, म्हणून तिने या बिग बॉस च्या घरात येण्याचा निर्णय घेतला.

मित्रहो, पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कीर्तनाच्या विश्वात शिवलीलाने आपला ठसा उमटवला आहे. तिची कीर्तनं सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होत असतात. शिवलीला मूळची सोलापूरच्या बार्शीतली आहे. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या शिवलीलाचे नाव आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे. शिवलीलाचे वडील बाळासाहेब पाटील हे देखील कीर्तनकार आहेत. कीर्तनाचे बाळकडू त्यामुळे तिला घरातूनच मिळाले आहे.

पाच वर्षांची असल्यापासून शिवलीला कीर्तन करते. आजवर तिने जवळपास १००० पेक्षा जास्त कीर्तनं केली आहेत. वयाच्या दहाव्या वर्षीच तिने ग्रामीण आणि शहरी भागांत आपला असा खास चाहता वर्ग निर्माण केला आहे. आपले शिक्षण पूर्ण करत तिने आपली कीर्तनाचीही आवड जोपासली आहे. कधी ग्रामीण बाजात, तर कधी प्रमाण भाषेत, कधी खरमरीत शब्दांत, तर कधी हलक्या फुलक्या विनोदी ढंगात कीर्तन करण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. तिची कीर्तनाची स्वतःची अशी शैली आहे.

कौटुंबिक जीवनातील वेगवेगळे प्रसंग, सामाजिक जीवनातील घडामोडी अशा अनेक विषयांवर कीर्तन करण्यात तिचा हातखंडा आहे. आपल्या कीर्तनातून ती तरुणाईला जीवनमूल्यांचं महत्त्व पटवून देते, तर कधी लोकांशी संवाद साधत अभंगांचं निरूपण करते. अल्पावधीतच तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच बिग बॉस च्या घरात तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याला शिवलीलाने सडेतोड उत्तर दिले. बिग बॉस च्या घरातील शिवलीलाचा प्रवास रंजक ठरणार हे नक्की!

You might also like