एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सैराट’ मधला सल्या काय करतो खऱ्या आयुष्यात? त्याचं काम बघून तुम्हालाही अभिमान वाटेल…

‘सैराट’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने अनेक इतिहास रचले. यात काम करणारे कलाकार नवखे असूनही त्यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. या चित्रपटाचा अजून एक फायदा म्हणजे यातली परश्या, सल्या आणि बाळ्या यांची मैत्री. यात काम करणारी मंडळी जशी पडद्यावर जिवाला जीव देणारे जिगरी दोस्त दाखवले आहेत, तसेच ते खऱ्या आयुष्यातही यारों के यार आहेत. यातला प्रत्येक जण आपल्या आपल्या वाटेवर प्रवास करत असला तरी एकमेकांचे वाढदिवस साजरे करणे, एकमेकांना भेटणे, त्याचे फोटो सोशल मीडिया वर शेअर करणे या गोष्टी सुरूच असतात.

तर दोस्तहो, आज आपण बघणार आहोत की या त्रिकुटातला सल्या म्हणजेच अरबाज शेख आता काय करतो. अरबाज मूळचा सोलापूरच्या जेऊर इथे राहणारा. ‘सैराट’ चे दिग्दर्शक नागराज मंजुळे देखील सोलापूरचेच. ‘सैराट’ च्या आधी त्यांनी ‘फॅन्ड्री’ सारखे हिट चित्रपट केले होते.

नागराज मंजुळेंच्या चित्रपटात काम करावं असं अरबाजलाही वाटायचं. पण नागराज यांची कलाकार निवडीची प्रक्रिया शिस्तबद्ध आणि काटेकोर असल्याने त्याला लगेचच त्यांच्या चित्रपटांमध्ये काम मिळणं अवघड होतं. पहिल्या ऑडिशन मध्ये नकार मिळाल्यानंतर त्याने आपल्या चुकांचा अभ्यास केला आणि त्या सुधारून परत ‘सैराट’ साठी ऑडिशन दिली. यावेळी मात्र तो नागराज यांच्या ऑडिशनच्या परीक्षेत खरा उतरला आणि ‘सल्या’ च्या भूमिकेसाठी त्याची निवड झाली.

अभिनयाव्यतिरिक्त अरबाजला खवय्येगिरी करण्याची आणि खाऊ घालण्याचीही आवड आहे. याशिवाय त्याला निसर्गात रमायलाही आवडतं. त्याच्या सोशल मीडियाच्या बऱ्याच पोस्ट्स मधले फोटो हे निसर्गाच्या सानिध्यात काढलेले दिसतात. त्याचं हे निसर्गात फिरणं सध्या मात्र लॉकडाऊनमुळे बंद आहे. मात्र हा पठ्ठ्या लॉकडाऊनच्या काळात शांत बसला नाहीये.

कोरोनाच्या संकटाने अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्याचप्रमाणे लॉक डा ऊनमुळे अनेक लोक रस्त्यावर आले. हाताला काम नसल्याने उपासमार सहन करावी लागणाऱ्यांची संख्या कमी नाही. या लोकांच्या मदतीसाठी धावला तो म्हणजे आपला सल्या अर्थात अरबाज शेख.

अशा गरजू लोकांना मदत करण्यासाठी सोलापुरातल्या अजित अतकरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह #WeWillHelp ही मोहीम राबवली. सोशल मीडियाद्वारे मदत करणारे लोक एकत्र आले आणि त्यांनी अनेक कुटुंबांना धान्य, खायच्या वस्तू आणि इतर सामान यांचे वाटप केले. स्वतःचं चित्रपटसृष्टीतलं यश डोक्यात जाऊ न देता अरबाजने देखील या मोहिमेत भाग घेत अनेक कुटुंबांना आधार दिला. अरबाजच्या या दिलदार व्यक्तिमत्वाला आमच्या टीमचा सलाम!

You might also like