एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘१००’ नंतर आता ‘२००’! रिंकू राजगुरूचा येतोय नवा चित्रपट, दिसणार एकदम नव्या लुक मध्ये..

अभिनयाची फारशी ओळख नसलेली रिंकू ‘सैराट’ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकली आणि तिच्या अभिनयाने लोकांना तोंडात बोटे घालायला भाग पाडले. ‘सैराट’ (२०१३) मधल्या ‘आर्ची’ च्या भूमिकेपासून सुरू झालेली रिंकू राजगुरूची घोडदौड अगदी यशस्वीपणे सुरू आहे. तिच्या या भूमिकेने तिला अनेक पुरस्कारदेखील मिळवून दिले. कागर, मेकअप यांसारखे चित्रपट आणि ‘अनपॉज्ड’ या शॉर्ट फिल्म मध्येही तिने काम केले. तिने काम केलेली ‘हंड्रेड’ ही वेब सिरीज हिट ठरली.

आता तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. ती दिग्गज अभिनेते अमोल पालेकर आणि बरूण सोबती यांच्याबरोबर ‘२००’ या हिंदी चित्रपटात काम करणार असल्याचे निश्चित झाले आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली. या चित्रपटाची निर्मिती ‘युडली फिल्म्स’ द्वारे करण्यात येणार आहे. झी५ वर या चित्रपटाचा प्रीमियर रिलीज होणार आहे. या नव्या घोषणेने रिंकूच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

अमोल पालेकर हे हिंदी चित्रपटसृष्टीतलं अत्यंत गाजलेलं नाव आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांतील अभिनयाबरोबरच अमोल पालेकर यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही बरेच नाव कमावले आहे. त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केले आहे. शांतता! कोर्ट चालू आहे (१९७१), रजनीगंधा (१९७४), छोटी सी बात (१९७६), चितचोर (१९७६), घरौंदा (१९७७), गोलमाल (१९७९), बातों बातों में (१९७९), नरम गरम (१९८१), श्रीमान श्रीमती (१९८२), समांतर (२००९) हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.

बरूण सोबती बद्दल बोलायचं तर त्याने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. स्टार प्लस च्या ‘श्रद्धा’ (२००९) मालिकेतून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. दिल मिल गए, बात हमारी पक्की है (२०१०) या मालिकांमध्येही त्याने काम केले आहे. २०११ मध्ये सुरू झालेल्या ‘इस प्यार को क्या नाम दू’ या मालिकेने त्याला खरी प्रसिद्धी मिळवून दिली. मैं और मि. राईट (२०१४) या चित्रपटातून त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तू है मेरा संडे (२०१७) आणि हलाहल (२०२०) हे त्याचे इतर चित्रपट आहेत.

‘२००’ चित्रपटाची कथा एका दलित महिलेवर आधारीत आहे. या दलित महिलेवर झालेला अन्याय आणि त्याविरोधात तिने दिलेला लढा असे या चित्रपटाचे साधारण कथानक आहे. रिंकू राजगुरू, अमोल पालेकर आणि बरूण सोबती अशा कलाकारांना घेऊन बनवण्यात येणाऱ्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात हा चित्रपट किती यशस्वी होतो हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच.

You might also like