एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आण्णा परत आलेत! ‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेचे कमबॅक..हि असणार वेळ

‘रात्रीस खेळ चाले ३’ ही मालिका मध्येच बंद पडल्याने प्रेक्षकांचा काही अंशी हिरमोड झाला होता. मात्र ‘रात्रीस खेळ चाले ३’ च्या प्रेक्षकवर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘रात्रीस खेळ चाले ३’ ही मालिका झी मराठी वाहिनीवर पुन्हा सुरू होत आहे. ही मालिका पुढच्याच आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने आपल्या रहस्यमयी कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेनेदेखील आपला प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता.

‘रात्रीस खेळ चाले २’ मध्ये ‘रात्रीस खेळ चाले’ च्या कथानकाचा भूतकाळ सांगण्यात आला होता. लोकांनी या मालिकेला देखील भरभरून प्रेम दिले होते. दोन्ही मालिकांची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी त्याचा पुढचा भाग म्हणजेच ‘रात्रीस खेळ चाले ३’ ची निर्मिती केली. मात्र कथेत अचानक झालेला पात्रांचा भरणा आणि मालिकेची बदललेली वेळ प्रेक्षकांच्या पचनी पडला नाही. मात्र आता मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक सरसावून या मालिकेच्या चित्रीकरणाच्या कामाला लागले आहेत.

को’रो’ना काळामध्ये या मालिकेचे चित्रीकरण थांबवावे लागले होते. नंतर चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याची वेळ आल्यावर कोकणातल्या पावसाने हाहाकार माजवला. त्यामुळे या मालिकेचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले. मात्र आता पुन्हा या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले आहे.

गेल्याच आठवड्यात या मालिकेचा लेखक आणि पांडूची भूमिका साकारणारा अभिनेता प्रल्हाद कुरतडकर याने ‘रात्रीस खेळ चाले ३’ पुन्हा सुरू होत असल्याचे सांगितले होते. या मालिकेत आण्णांची भूमिका करणाऱ्या अभिनेते माधव अभ्यंकरांनी सोशल मीडिया वर सेट वरचा फोटो शेअर करत चित्रीकरण सुरू झाल्याची माहिती दिली आहे.

आता आण्णा, माई, शेवंता, पांडू ही प्रेक्षकांची आवडती पात्रे पुन्हा त्यांच्या भेटीला येणार आहेत. १६ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता ‘रात्रीस खेळ चाले ३’ ही मालिका प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

याबाबत अजून झी मराठी वाहिनीने अधिकृत घोषणा केलेली नाही. नवी मालिका ‘ती परत आलीये’ ही मालिका रात्री १०:३० वाजता प्रसारीत होणार आहे. विजय कदम या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत.

या वेळेत सध्या प्रसारीत होणारी मालिका ‘देवमाणूस’ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १५ ऑगस्ट ला दोन तासांच्या विशेष भागानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल. ‘रात्रीस खेळ चाले ३’ पुन्हा प्रेक्षकांच्या मनाची पकड घेऊ शकेल का, हे पाहणे मनोरंजक ठरेल.

You might also like