एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘इतनी शक्ती हमे देना दाता…’ फेम गायिकेवर आली हलाखीत जगण्याची वेळ..

बॉलिवूडमध्ये सतत नवीन नवीन चित्रपट येत राहतात आणि त्याचबरोबर येतात ती त्यातील गाणी. बॉलिवूडचे चित्रपट आपल्या खूप साऱ्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्याकडे एका चित्रपटात किमान ४ ते ५ गाणी असतातच. यातली सगळीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतात असे नाही. मात्र काही गाणी अशी असतात जी आपल्या शब्दांमुळे, आवाजामुळे किंवा संगीतामुळे अजरामर होऊन जातात. लोक चित्रपट विसरले तरी ही गाणी त्यांच्या कायम लक्षात राहतात.

अशी अजरामर गाणी देणाऱ्यांच्या बाबतीत मात्र हे अमरत्व कधी कधी फारसे वाट्याला आलेले दिसत नाही. प्रेक्षकांच्या मनावर गारुड करतील अशी गाणी तयार करणाऱ्या आणि त्यात आपल्या आवाजाने प्राण फुंकणाऱ्या कलाकारांना बऱ्याचदा अवहेलना सोसावी लागते. अपुरे मानधन, तेही वेळेत मिळत नाही, सतत नसणारे काम, वय झाल्यावर होणारी हेळसांड अशाच बऱ्याच गोष्टींचा सामना या कलाकरांना करावा लागतो.

अशीच बिकट परिस्थिती आली आहे एका गायिकेवर. १९८६ मध्ये ‘अंकुश’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. १९८६ या साली बाकी चित्रपटांना फारसा गल्ला जमवता आला नव्हता, मात्र ‘अंकुश’ चित्रपटाच्या बाबतीत उलटे घडले. जवळपास १३ लाख रुपयांमध्ये बनलेला हा चित्रपट ९५ लाखांची कमाई करत त्या वर्षीचा हिट चित्रपट ठरला. या चित्रपटातील ‘इतनी शक्ती हमे देना दाता…’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले.

हे गाणे इतके लोकप्रिय झाले की आजही काही शाळांमध्ये दिवसाची सुरुवात ही या प्रार्थनेने होते. एकीकडे येणाऱ्या प्रत्येक दिवशी हे गाणे आपल्या विचारांनी नव्या पिढीला प्रभावित करत आहे, तर दुसरीकडे हे गाणे गाणाऱ्या गायिकेला मात्र एक एक दिवस कसाबसा निभावत न्यावा लागत आहे. हे गाणे गायिले होते पुष्पा पागधरे या गायिकेने. आपल्या आर्त स्वरांनी त्यांनी या गाण्याला अजरामर करून टाकले आहे.

मात्र सध्या त्यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली आहे. त्यांच्या वाट्याचे किमान निवृत्तीवेतन मिळवताना देखील त्यांना कष्ट पडत आहेत. त्यांच्या निवृत्तीवेतनाचे पैसे त्यांना वेळेत मिळत नसल्याने रोजचा दिवस काढणे मुश्किल झाले आहे. पुष्पा पागधरे यांना कलाकार म्हणून महाराष्ट्र शासनाकडून ३१५० रुपये मिळतात. मात्र तेही वेळेवर मिळत नसल्याने त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

पुष्पा यांच्या मते, हल्लीच्या कलाकरांना चांगले मानधन मिळते. पूर्वी निर्माते ठरवून देतील तेवढंच मानधन पदरात पडत असे. ‘इतनी शक्ती…’ या गाण्यासाठी त्यांना केवळ २५० रुपये मानधन मिळाले होते. गेल्या ३५ वर्षांमध्ये त्यांना एकाही संगीत कंपनीने रॉयल्टी दिलेली नाही. उतारवयात तरी हा संघर्ष थांबवा, अशीच त्यांची इच्छा आहे.

You might also like