एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

लढाई अजून जारी आहे! अफगाणिस्तानचा एक प्रांत अजूनही लढतो आहे..

अफगानिस्तान अजून हरलेला नाहीय. एका प्रांताने तालिबानच्या नाकीनऊ आणले आहे..

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केला आहे. २० वर्षांनंतर पुन्हा अफगाणिस्तानवर तालिबानचे राज्य आले आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी देश सोडला आहे. राजधानी काबूलमध्ये सर्वत्र केवळ तालिबानी द’ह’श’तवादी दिसत आहेत.

काबूल पडले, मात्र अफगाणिस्तानने अजून हिंमत हरली नाहीये. अफगाणिस्तानमधील एक प्रांत मात्र अजूनही तालिबानला ताब्यात घेता आला नाहीये. चहूबाजूंनी वेढलेला असूनही या प्रांतातले लढवय्ये निकराची झुंज देत आहेत.

तालिबान सध्या अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मात्र हा एक प्रांत त्यांच्या ताब्यात आला नाहीये. या प्रांताचे नाव आहे पंजशीर. अफगाणिस्तानमध्ये एकूण ३४ प्रांत आहेत.

पंजशीर प्रांत देशाच्या उत्तर पूर्वेकडील भागात येतो. मात्र हा असा एकमेव प्रांत आहे जो ना कधी तालिबानसमोर नमला, ना रशियाच्या ताब्यात गेला. पंजशीरने तालिबानसमोर शरणागती पत्करली तर मोठी खळबळ उडेल.

९/११ च्या हल्ल्याच्या दोन दिवस आधीच अहमद मसूद याचे वडील अहमद शाह मसूद यांची ह’त्या केली होती. अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई यांनी हमद शाह मसूद यांना ‘राष्ट्राचे नायक’ असा किताब दिला होता. मसूद आणि त्यांच्या साथीदारांचा तालिबानला संपवण्यात मोठा वाटा होता. अहमद शाह मसूद यांना ‘पंजशीरचा वाघ’असे देखील म्हटले जाई.

सोव्हिएत रशियाने जेव्हा हा प्रांत ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला होता, तेव्हा अहमद शाह मसूद यांनी त्यांचा हा बेत हणून पाडला होता आणि पंजशीरच्या इंचभर जागेवर देखील त्यांना पाय ठेवू दिला नव्हता.

त्यानंतर जेव्हा तालिबानने हा प्रांत काबीज करायचा प्रयत्न केला, तेव्हाही अहमद शाह मसूद यांच्यामुळे तालिबानला पंजशीरवर कब्जा करता आला नव्हता. त्यांचा मुलगा अहमद मसूद आपल्या वडिलांची गादी चालवत असल्याचे दिसत आहे.

अहमद मसूदने तालिबानला शरण जाण्यास नकार दिला आहे. सोशल मीडिया वर मात्र याबाबत थोडा गोंधळ उडाल्याचे दिसते. सध्या सोशल मीडिया वर अहमद मसूदचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात त्याने तालिबानशी बोलण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. सोशल मीडिया वर अशाही बातम्या पसरत आहेत की अहमद मसूद ने शरणागती पत्करली आहे. मात्र पंजशीरच्या नेत्यांकडून या गोष्टीबाबत कोणतेही वक्तव्य करण्यात आले नाहीये.

अहमद मसूद २०१६ पर्यंत लंडनमध्ये शिकत होता. अफगाणिस्तानात परत येत त्याने २०१९ मध्ये राजकारणात प्रवेश केला. ३२ वर्षीय अहमद मसूद सोबत मिळून अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अमरुल्लाह सालेह हे तालिबानशी लढण्याची रणनीती आखत असल्याचे बोलले जात आहे. या दोघांच्या बैठकीचे फोटो समोर आल्यानंतर ही चर्चा सुरू झाली.

You might also like