एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अवघ्या २१ व्या वर्षात केला यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा पराक्रम! लातूरच्या कन्येची यशोगाथा…

नुकताच यूपीएससी परीक्षेचा निकाल लागला. महाराष्ट्रातील अनेक उत्तीर्ण उमेदवारांमुळे महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. या उमेदवारांपैकीच एक नाव म्हणजे नितीशा जगताप. लातूरच्या या मुलीने अवघ्या २१ व्या वर्षी ही परीक्षा पास केली आहे, ते पण चक्क पहिल्याच प्रयत्नात. अथक परिश्रम आणि यश संपादन करण्याची जिद्द यामुळेच हे होऊ शकले आहे. ज्या वयात मुले पदवी देखील संपादन करू शकत नाहीत, त्या वयात या मुलीने यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होत हे उज्ज्वल यश मिळवले आहे.

नितीशाने पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होत देशभरात १९९ वी रँक मिळवली आहे. मोठं होऊन सरकारी ऑफिसर व्हायचं आणि सरकारी नोकरी करायची, असं स्वप्न तिनं लहानपणीच पाहिलं होतं. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायची तयारीही तिने ठेवली होती. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये नितीशाने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. तिची आईदेखील तिच्याबरोबर पुण्यात राहायला आली होती.

कसा केला अभ्यास?
बऱ्याचदा विद्यार्थी आपला पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून यूपीएससी च्या तयारीला लागतात. नितीशाने मात्र तसं न करता शिक्षण घेत असतानाच यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. तिच्या हातात त्यामुळे अभ्यास करण्यासाठी बराच वेळ होता. चार वर्षांच्या तिच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि अगदी पहिल्या प्रयत्नातच तिने यूपीएससी क्रॅक केली. अभ्यासाबरोबरच तिची जिद्द देखील तिच्या या यशाची वाटेकरी आहे.

सोपी झालेली मुलाखत
यूपीएससीची लेखी परीक्षा दिल्यानंतर येते ती खरी परीक्षा. समोरासमोर होणाऱ्या मुलाखतींमध्ये अनेक जण आपला आत्मविश्वास हरवून बसतात आणि हातातोंडाशी आलेला घास नजरेसमोर निसटून जातो. नितीशाने मात्र ही मुलाखत आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर अगदी लगेच जिंकली. तिने सांगितले, की तिला ही मुलाखत देणे फारसे कठीण गेले नाही. “त्यांनी विचारलेल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे मी आत्मविश्वासाने दिली आणि ज्या प्रश्नांची उत्तरे येत नव्हती, त्याबद्दल मी स्पष्ट सांगितले,” असे नितीशा सांगते.

ज्या वयात मुले कॉलेजच्या कट्ट्यांनाच आपले घर मानतात, अशा वयात नितीशाने सगळ्या मोहांना बाजूला सारत आपले स्वप्न साकार केले. इतक्या लहान वयात तिने मिळवलेले यश विलक्षण आहे. त्यासाठी तिच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आमच्या टीम कडूनदेखील तिच्या या यशाबद्दल अभिनंदन आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!

You might also like