एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

नारायण राणेंना अटक! रत्नागिरी पोलिसांनी केली कारवाई

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलेच महागात पडले आहे. राज्यभरातून नाशिक, पुणे आणि महाड या तीन ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लावण्याबद्दलचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चांगलंच भोवलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त भाषण केले होते. त्यावेळी एका पत्रकार परिषदेत त्यांच्या भाषणावर टीका करत नारायण राणे यांनी “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरकमहोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असे उद्गार काढले. नारायण राणे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. सोमवारी रायगड मधील महाड मध्ये नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी नावाने संबोधत त्यांच्यावर टीका केली.

यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी पोहोचले. मात्र पोलिसांकडे कोणतेही अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अधिकृत कागदपत्रे नसल्याने नारायण राणे यांनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला. नंतर मात्र ते बाहेर आले आणि त्यांना अटक करण्यात आली. त्यांना त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस आपल्याबरोबर घेऊन गेले. यावेळी निलेश राणे आणि समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्याने त्यांना असे करण्यात यश आले नाही.

दरम्यान रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. गुन्हे रद्द करण्याच्या आणि अटकेपकसून दिलासा देण्याच्या मागणीसाठी नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नोटीस न देताच अटकेच्या कारवाईचा घाट घातल्याचा आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला. कोर्टाने मात्र त्यांच्या वकीलाला योग्य ती प्रक्रिया पार पाडून याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अशा पद्धतीने त्यांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करणे म्हणजे पर्यायाने महाराष्ट्रातील जनतेचाच अपमान करण्यासारखे आहे, त्यांचे हे वागणे सहन केले जाणार नाही, नारायण राणेंनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी विविध पक्षांच्या नेत्यांनी केली आहे.

You might also like