एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

ऑलिम्पिक मध्ये मीराबाई चानूला रौप्य! मीराबाईचे कष्ट, मनातली धाकधूक आणि कुटुंबियांचा जल्लोष..

जपानची राजधानी टोकियो येथे यंदाचे ऑलिम्पिक सामने सुरू झाले आणि सगळ्या जगाचे लक्ष या खेळांकडे लागून राहिले आहे. विशेषतः यावेळी भारतासाठी पदकांची खाते कोण आणि कधी उघडणार याची उत्सुकता भारतीयांमध्ये लागून राहिली होती. मीराबाई चानू ने महिला वेटलिफ्टींग मध्ये ऑलिम्पिक स्पर्धांच्या दुसऱ्या दिवशीच रौप्य पदक जिंकल्याने भारतभर जल्लोषाचे वातावरण असून भारतीयांच्या आशा उंचावल्या आहेत.

४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू ने ही रौप्य पदकाची कमाई केली आहे. यावर्षीच्या ऑलिम्पिक मधील भारताचे हे पहिले पदक आहे. ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक मिळवणारी मीराबाई चानू दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याबरोबरच वेटलिफ्टींग मध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी देखील ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. त्याआधी २००० साली कर्णम मल्लेश्वरीनं सिडनी ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती.

मीराबाई चानूच्या रौप्य पदकाची बातमी कळताच मणिपूर येथील तिच्या राहत्या घरी जल्लोष करण्यात आला. तिच्या या कामगिरीमुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामुळे आणि तिच्या होणाऱ्या कौतुकामुळे तिच्या घरचे, नातेवाईक आणि गावातील लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नाहीये. मीराबाईचा या टप्प्यापर्यंत पोचण्याचा प्रवास हा खूपच खडतर होता.

/p>

मीराबाईनं मणिपूरच्या कुंजूरानी यांना पाहून वेटलिफ्टर होण्याचा निर्णय घेतला. २००७ साली जेव्हा तिने सरावाला सुरुवात केली तेव्हा लोखंडी रॉड नसल्याने लाकडी रॉडने सराव करावा लागायचा. तिचा आहार सांभाळणं तिच्या कुटुंबाला परवडणारं नव्हतं, पण तिच्या आईने ही जबाबदारी व्यवस्थित सांभाळली. वेटलिफ्टींग चं प्रशिक्षण घेण्यासाठी मीराबाईला रोज पहाटे लवकर उठून २२ किमी प्रवास करून इंफाळला जावं लागायचं. त्यानंतर घरी येऊन तिला शाळेची तयार करावी लागायची. शाळेतून आल्यावर तिला आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागायचं. यातच तिचा दिवस निघून जात असे.

तिच्यासाठी कुटुंबाने केलेला खर्च आणि हलाखीत काढलेले दिवस यामुळे रिओ ऑलिम्पिक मध्ये आलेले अपयश तिच्या फारच मनाला लागले. त्यानंतर तिला आलेल्या नैराश्यावर मात करत तिने सरावावर लक्ष केंद्रीत केले. रिओ ऑलिम्पिक नंतर ती घरी कमी आणि प्रशिक्षण केंद्रावर जास्त राहू लागली. तिच्या या कष्टाचे फळ अखेर यावर्षीच्या ऑलिम्पिक मध्ये तिला मिळाले. याआधी २०१४ साली ग्लासगो मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने कांस्य पदक, तर जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. आमच्या टीमतर्फे मीराबाई चानूच्या जिद्दीला सलाम आणि तिच्या यशासाठी तिचे खूप अभिनंदन!

You might also like