एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘मला नुसती लाईन मारता येते’ या मुलाचा निरागस व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल..

लहान मुले इतकी निरागस असतात की ती काहीही बोलली तरी हसायला येते. त्यात जेव्हा ही मुले अभ्यासावरून काही बोलायला लागतात तेव्हाचा त्यांचा निरागसपणा तर विचारूच नका! तसं पाहायला गेलं तर लहान मुले आणि अभ्यास यांचा छत्तीसचा आकडा आहे.

अभ्यास करायला आवडणारी मुले शोधायला गेलं तर अगदी बोटावर मोजण्याइतकी सापडतील. लहान मुलांना अभ्यास करायला लावणे म्हणजे दिव्यच आहे. घरी या मुलांचा अभ्यास घेणे कठीण असते त्यामुळे त्यांना मग ट्युशनला पाठवले जाते. तरीदेखील ही मुले अभ्यास करत नाहीतच आणि या मुलांची अभ्यास न करण्याची कारणं तर अफलातून असतात.

सध्या अशाच एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ट्युशनच्या बाई जेव्हा त्याला अभ्यास करायला सांगतात तेव्हा त्याने अत्यंत निरागसपणे दिलेली कारणं ऐकून ओठांवर हसू आल्याशिवाय रहात नाही. या लहानग्याचं नाव श्रीराज आहे.

सदर व्हिडिओ ट्युशनच्या बाईंनी काढला आहे. बाई जेव्हा श्रीराजला त्याची वही बघून ‘हे काय लिहिलं आहे श्री तू?’ असं विचारतात तेव्हा तो अतिशय निरागसपणे ‘काही नाही लिहिलंय’ असं सांगतो.

मग बाई जेव्हा त्याला काहीतरी लिही असं सांगतात तेव्हा तो ‘वन लिहू का?’ असं विचारतो. ते लिहून झाल्यावर बाई त्याला ‘टू’ काढायला सांगतात. पटकन पेन्सिल हातात घेऊन श्री ‘टू’ काढतो. ‘थ्री’ काढायला सांगितल्यावर मात्र ‘मला थ्री’ काढता येत नाही, असं श्रीराज रडवेला होऊन सांगतो.

मग बाईंनी त्याला ‘ए फॉर ऍप्पल’ काढ असे म्हटल्यावर ‘मला ए फॉर ऍप्पल काढता येत नाही’ असे डोळ्यांत पाणी आणून सांगतो. बाई त्याला खोटं खोटं रागवून ‘मग काय येतं तुला काढता?’ असं विचारतात. यावर मात्र या पोरानं नकळतपणे भन्नाट असं मजेशीर उत्तर दिलं आहे.

तो म्हणतो, “मला ना, फक्त लाईन मारता येते.” हे म्हणताना त्याच्या डोळ्यांत दाटून आलेले निरागसतेचे भाव आणि त्याचा क्यूट चेहरा बघून हसू आल्याशिवाय राहात नाही.

पुढे त्याने आपल्याला अभ्यास करायला का आवडत नाही याचेदेखील मजेशीर कारण सांगितले आहे. बाई आणि त्या निरागस मुलाचा संवाद ऐकून कोणालाही हसू येईल. आपल्याला हा संपूर्ण व्हिडिओ यूट्यूब वर ‘Shreeraj Vlogs’ या चॅनेलवर पाहता येईल. श्रीराजची आई त्याचे अनेक मजेशीर व्हिडिओ काढून या चॅनेल वर अपलोड करत असते. तुम्हाला या निरागस मुलाचा व्हिडिओ कसा वाटला, हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका.

You might also like