एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘वडिलांच्या औषधालाही पैसे नव्हते…’ नानांच्या डोळ्यांत तरळले पाणी…

सोनी मराठी वाहिनी वरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता सचिन खेडेकर आपल्याला या कार्यक्रमाचे होस्टिंग करताना दिसत आहेत. या कार्यक्रमाच्या ‘कर्मवीर स्पेशल’ भागामध्ये नुकतीच दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी हजेरी लावली. या भागादरम्यान हॉ’ट सीटवर बसलेल्या नानांच्या डोळ्यांत काही काळ पाणी तरळले आणि सगळेच काहीसे भावुक झालेले यावेळी बघायला मिळाले.

यावेळी बोलताना नाना म्हणाले, “मी आज एक नट आहे. माझ्या वडिलांना म्हणजेच आमच्या काकांचं नाटक आणि सिनेमावर खूप प्रेम होतं. एक बाप आपल्या मुलाला घेऊन तमाशाला जातो, हे ऐकायला विचित्र वाटेल. पण माझे वडील मला तमाशाला घेऊन जायचे. तू चल, त्या कलाकारांचा अभिनय पहा, असं ते कौतुकाने सांगायचे आणि मला सोबत न्यायचे.”

आपल्या वडिलांच्या औषधासाठी आपल्याकडे पैसे नव्हते, हे सांगताना नाना फार भावुक झाले होते. ते म्हणाले, “वडील आजारी होते, त्या त्यांच्या शेवटच्या दिवसांत माझी परिस्थिती फार नीट नव्हती. दुर्दैवाने नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ते गेले. औषधालाही पैसे नव्हते. मंगेश आणि मी केईएम हॉस्पिटलच्या बाहेर एका दुकानाच्या पायरीवर बसलो होतो आणि माझे वडील आतमध्ये जनरल वॉर्ड मध्ये होते.”

नानांनी यावेळी आपल्या वडिलांच्या काही आठवणी ताज्या केल्या. नानांना त्यांच्या वडिलांना स्वतःचे चित्रपट दाखवायचे होते. काही आठवणींना उजाळा देताना नाना म्हणाले, “माझं ‘महासागर’ आलं तेव्हा ते पाहायचंय असं काका म्हणाले. तुम्ही पाहिलंय ना ते नाटक, असं मी त्यांना म्हणालो. त्यावर ‘नाही रे, गेल्या वेळी मी पाहायला निघालो आणि चष्मा पडला. त्याच्यावर पाय पडला आणि तो फुटला.

पण तुला वाईट वाटेल म्हणून बोललो नाही’ असं ते मला म्हणाले. काका आजारी होते. पण मी त्यांना घेऊन शिवाजी मंदिर मध्ये गेलो होतो. मी तो प्रयोग फक्त काकांसाठीच केला होता. त्यानंतर माझे सिनेमे त्यांना पाहता आलेच नाहीत.”

“काकांना मी भौतिक सुख देऊ शकलो नाही,” हे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यामुळे सेटवर देखील काही क्षण सगळेच भावुक झाले होते. नानांचे आणि त्यांच्या वडिलांचे एकमेकांबरोबरचे असलेले नाते बघून काही काळ सगळेच स्तब्ध झाले होते. अशा काही कार्यक्रमांच्या निमित्तानेच लोकांना कलाकारांच्या खासगी आयुष्यात डोकावायची संधी मिळते आणि हे कलाकार माणूस म्हणून कसे आहेत, हेदेखील पाहता येते.

You might also like