एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

देवीसिंग कायम स्मरणात राहील; निरोप देताना किरण गायकवाड झाला भावुक

अखेर तो संपला! ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवटचा भाग संपला. रविवारी १५ ऑगस्ट रोजी झी मराठी वाहिनी वरील ‘देवमाणूस’ मालिकेचा विशेष भाग प्रसारीत करण्यात आला. दोन तासांचा हा महाएपिसोड या मालिकेचा शेवटचा भाग होता.

जवळपास वर्षभर चालू असलेल्या या मालिकेने अखेरीस प्रेक्षकांचा निरोप घेतला. सत्य घटनेवर आधारीत या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. आपल्या रहस्यमयी कथानकाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ही मालिका आता संपली असल्याने प्रेक्षकांना हळहळ वाटत आहे.

या मालिकेतील जवळपास सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या बनल्या होत्या. आता या व्यक्तिरेखांना बघता येत नसल्याने प्रेक्षक त्यांना खूप मिस करत आहेत. अजितकुमार, डिंपल, सरू आजी, टोन्या, मंगल, मंजुळा, दिव्या सिंग, आर्या देशमुख, चंदा या व्यक्तिरेखांची कामे करणाऱ्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली होती.

आता हे कलाकार त्यांना या मालिकेत दिसणार नाहीत. त्यामुळे या मालिकेच्या शेवटी शेवटी मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड खूपच भावुक झाला होता.

किरण गायकवाडने ‘देवमाणूस’ मालिकेत डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंगची भूमिका साकारली होती. या आधी आपण किरणला ‘लागीरं झालं जी’ या मालिकेत नकारात्मक भूमिकेत पाहिलं होतं. मात्र प्रमुख पात्र म्हणून किरणची ‘देवमाणूस’ ही पहिलीच मालिका. त्यामुळेच ही मालिका संपताना किरण खूप भावुक झाला होता. या मालिकेत त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने पुन्हा एकदा जिंकून घेतली.

किरण आपल्या या प्रवासाविषयी सांगताना म्हणाला, “देवमाणूस मालिकेने माझी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा कार्यक्रम आणि माझी त्यातील भूमिका ही नेहमीच माझ्या जवळची राहील. कारण या भूमिकेने मला प्रेक्षकांचं अफाट प्रेम आणि पाठींबा मिळवून दिला. ही मालिका जरी प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी या मालिकेने त्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे, जे अढळ आहे.”

मालिकेचा शेवटचा विशेष भाग प्रसारीत होण्यापूर्वी किरणने प्रेक्षकांना हा भाग आवर्जून बघण्यासाठी आवाहन केले. “सध्या डॉक्टर अजितकुमारच्या भूमिकेला जरी पूर्णविराम लागला असला तरी पुन्हा एकदा वेगळं काहीतरी घेऊन मायबाप प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होईन. तोपर्यंत प्रेक्षकांनी अजितकुमारवर प्रेम करत राहावं आणि हा विशेष भाग जरूर पाहावा.” किरण गायकवाडला पुन्हा एखाद्या मालिकेत बघण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक आहेत.

You might also like