एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मूर्ती लहान पण कीर्ती महान! समाजाने मारले टोमणे, पण तरी झाली आयएएस…

शारीरिक व्यंग असणाऱ्या व्यक्तींची आपल्या समाजात फार हेटाळणी केली जाते. त्यात जर ती मुलगी असेल, तर विचारूच नका. लोक अशा मुलींबरोबरच तिच्या आईवडिलांनाही कमी जास्त बोलायला मागे पुढे पहात नाहीत. समाज अशा मुलींना स्वीकारत नाही. त्यामुळे स्वतःच्या अस्तित्वासाठीही या मुलींना सतत झगडावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मुलीबद्दल सांगणार आहोत, जिची तिच्या उंचीमुळे थट्टा केली जायची. मात्र तिने आज स्वतःच्या मेहनतीने स्वतःचे नाव मोठे केले आहे.

या मुलीचे नाव आहे आरती डोगरा. आरतीचा जन्म उत्तराखंड मधल्या डेहराडून येथे झाला. या मुलीची उंची आहे केवळ ३ फूट ६ इंच. लोकांनी आधी ती एक मुलगी आहे म्हणून आणि नंतर तिच्या कमी उंचीवरून सतत तिला टोमणे मारले आहेत. इतकेच काय, लोकांची चक्क तिच्या आईवडिलांना ‘अशी मुलगी सांभाळण्यापेक्षा तुम्ही हिला मारून का टाकत नाही?’ असे बोचरे प्रश्न वजा सल्ले देण्यापर्यंत मजल गेली आहे. मात्र आरतीच्या आईवडिलांनी आपल्या मुलीला कधीच अंतर दिले नाही. त्यांनी तिला शिकवलं. खूप शिकवलं. आज आरती आपल्या शिक्षणाच्या बळावर चक्क आयएएस ऑफिसर झाली आहे.

२००६ च्या बॅचमधून आरती आयएएस झाली आहे. आरती डोगरा आज राजस्थान केडरची आयएएस ऑफिसर बनली आहे. मूर्ती लहान असलेली आरती आज देशभरातील महिला आयएएस अधिकाऱ्यांसाठी एक कीर्तिमंत उदाहरण बनली आहे. आरतीने सामाजिक परिवर्तनासाठी अनेक मॉडेल्स बनवली आहेत. प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आरतीच्या या मॉडेल्सचं कौतुक केलं आहे. आपल्या आतापर्यंतच्या एकूण कार्यकाळात आरती नेहमीच उत्तम कामगिरी करत आली आहे.

सध्या आरती राजस्थानच्या अजमेर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पहात आहे. त्या आधी आरतीने अजमेरच्या एसडीएम या पदावरही काम केले आहे. जोधपूर डिस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची धुराही आरतीने सांभाळली आहे. हे पद सांभाळणारी ती पहिली महिला आयएएस ठरली. आरतीने ‘स्वच्छ भारत’ मोहिमेअंतर्गत बिकानेर मध्ये ‘बंको बीकाणो’ नावाची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे लोकांना उघड्यावर शौच न करण्यास प्रेरित केले गेले. आरतीने केलेल्या विविध कामगिरींसाठी तिला राज्य आणि केंद्र शासनाकडून अनेक वेळा गौरवण्यात आले आहे.

आरती डोगराची ही कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. इच्छाशक्ती असेल तर आपल्या कमजोरीवर मात करून जग जिंकता येतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आरती. नव्या पिढीसाठी आरतीची ही जीवनकहाणी नक्कीच स्फूर्तिदायक आहे.

You might also like