एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दातात अडकलेल्या टॉफी बरोबर ‘गुलाबी आँखें…’ गाणं! या चिमुकल्याचा हा गोड आवाज ऐका…

काही लहान मुलांचा आवाज इतका गोड असतो की ऐकतच राहावंसं वाटतं. सध्या जसे ‘बचपन का प्यार’ गाण्यातला मुलगा व्हायरल होत आहे, तसाच काही वर्षांपूर्वी एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. शाळेतल्या या निरागस मुलाने म्हटलेले गाणे ऐकून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. या मुलाला हे गाणे म्हणण्यात फार रस आहे असे वाटत नाही, पण गाणे म्हणायला सांगितल्यावर मात्र त्याने ते खूप गोड आवाजात म्हटले आहे.

हा व्हिडिओ एका शाळेत जाणाऱ्या लहान मुलाचा आहे. हा व्हिडिओ त्याच्या शाळेतल्या शिक्षिकेने बनवला आहे. शाळा सुटायची वेळ झाली आहे, मात्र शिक्षिका त्याला एक गाणे म्हणण्यास सांगत आहेत. ‘द ट्रेन’ या जुन्या हिंदी चित्रपटातील ‘गुलाबी आँखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया’ हे ते सदाबहार गाणं आहे. मुलाची थोडीशी चिडचिड झाल्यासारखी वाटते पण तो गाणे म्हणायला सुरुवात करतो.

मस्त तोंडाचा चंबू करत तो हे गाणं म्हणताना दिसत आहे. काही ओळी म्हणताच मध्येच त्याने बाईंना आपल्या दातात टॉफी अडकल्याचे खूप निरागसपणे सांगितले. बाई मात्र त्याच्या गाणं म्हणण्यावर अडून बसल्या आहेत. पुन्हा थोडीशी चिडचिड करत आणि तोंडाचा चंबू करत गाण्याच्या पुढच्या काही ओळी देखील या मुलाने गायल्या आहेत. एक कडवं म्हटल्यावर मात्र तेवढ्याच प्रामाणिकपणाने त्यानं पुढचं गाणं येत नाही असं सांगितलं. मग मात्र बाईंचं समाधान झालं आणि त्या ठीक आहे म्हणाल्या.

मंडळी, हा व्हिडिओ बघताना तुम्ही या मुलाच्या आणि त्याच्या गोड आवाजाच्या प्रेमातच पडाल. या मुलाचे नाव जॉय आहे. आता हा मुलगा बराच मोठा झाला आहे. त्याचे स्वतःचे युट्यूब चॅनेल देखील आहे. त्याच्या युट्यूब चॅनेलचे नाव ‘द जॉयफूल सिंगर’ (The Joyful Singer) असे आहे. आपल्या चॅनेल वर तो वेगवेगळ्या गायकांची गाणी गाताना दिसतो. त्याने अनेक समारंभांमध्येही काही गाणी गायली आहेत. त्याचे व्हिडिओ देखील त्याच्या या चॅनेल वर पाहायला मिळतात.

गाणी म्हणण्याबरोबरच जॉय एक कीबोर्ड प्लेयर देखील आहे. वेगवेगळ्या गाण्यांचे कव्हर्स त्याने या कीबोर्ड वर वाजवले आहेत. केवळ सात वर्षांच्या या मुलाने केलेली ही प्रगती बघून या मुलाचा खरंच अभिमान वाटतो. मित्रांनो, तुम्हाला या लहानग्या गायकाचा हा सुरेल व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका.

You might also like