एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कोल्हापूरला ‘कलापूर’ हे नाव परत द्या: अभिनेते सचिन पिळगावकरांची मागणी..

कोल्हापूर..आपल्या विविधतेने प्रसिद्ध असलेले हे शहर. पुण्याला जसं विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, तसं कोल्हापूरला कलेचं माहेरघर म्हणतात. त्यामुळे कोल्हापूरचे नाव ‘कलापूर’ करा अशी आग्रही मागणी अभिनेते सचिन पिळगावकर यांनी केली आहे. ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ या कार्यक्रमात त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली. या कार्यक्रमात त्यांनी कोल्हापूरबाबत काही खुलासे केले.

‘कोल्हापूर’ हे मुळात कोल्हापूरचं मूळ नाव नाही, असं सचिन पिळगावकर म्हणाले. ते म्हणाले, “कोल्हापूर हे त्या जागेचं नाव कधीच नव्हतं. ते कलेचं माहेरघर होतं. तिथं चित्रपटसृष्टी होती, सर्व प्रकारचे कलाकार होते. म्हणून त्याचं नाव कलापूर होतं. इंग्रजांनी ‘कलापूर’ चं ‘कोल्हापूर’ केलं. त्यामुळे कोल्हापूरचं नाव पुन्हा एकदा कलापूर व्हावं, अशी माझी इच्छा आहे.” यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले.

सध्याच्या चित्रपटसृष्टीवरही यावेळी त्यांनी भाष्य केलं. आज सिनेमात बदल झाले, अत्याधुनिक तंत्रज्ञान आलं. डिजिटायझेशन झालं, पण अधिसारखी मजा नाही राहिली, असं सचिन पिळगावकर म्हणाले. आपल्याला हा बदल मान्य असल्याचंही त्यांनी कबूल केलं. त्यापुढे त्यांनी ते अजूनही शिकत आहेत असं सांगितलं. सचिन पिळगावकर स्वतः उत्तम अभिनेते असण्याबरोबरच एक चांगले दिग्दर्शकही आहेत. आपल्या या प्रवासाबद्दल देखील त्यांनी काही आठवणी जाग्या केल्या.

सचिन पिळगावकर स्वतःच्या दिग्दर्शन शैली बद्दल म्हणाले, की “माझ्यावर शहरी संस्कार झाले होते. त्यामुळे माझी विचार करण्याची पद्धतही शहरी होती. माझ्या सिनेमांतही याची झलक दिसते. गावातील चित्रपट मी शहरात आणले. हा खूप मोठा बदल होता.” सचिन पिळगावकरांबरोबर तोडीस तोड अजून एक अभिनेता होता जो त्यांच्याबरोबरच दिग्दर्शनातही तरबेज होता. ते होते अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे. सचिन पिळगावकरांसोबतच महेश कोठारेंनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान मोठे आहे.

आपल्या या मित्र आणि त्याचवेळी दिग्दर्शनातील प्रतिस्पर्धी असलेल्या महेश कोठारेंबद्दल बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले, “माझ्यानंतर महेश कोठारे याने अनेक नवे प्रयोग केलेत. आमच्यात एक प्रकारची स्पर्धा होती. महाराष्ट्रात सिनेसृष्टीत नवं तंत्रज्ञान आणण्याचं श्रेय मी त्यालाच देईन.” पुढे त्यांनी आजकालच्या प्रेक्षकांवरही भाष्य केले. आजचा प्रेक्षक फार दक्ष झाला आहे. त्यामुळे त्यांच्यानुसार कलाकृती घडवणारे लोक आपली माध्यमं बदलत राहणार, असेही सचिन म्हणाले. प्रेक्षकांना उगीच काहीही करून दाखवता येत नाही, कारण ते लगेच पकडतात, असेही त्यांनी सांगितले.

You might also like