एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

पहिल्यांदाच सलमान खान बाप्पाच्या उत्सवात सहभागी नाही! हे होतं कारण…

दरवर्षी गणेशोत्सव म्हटलं की सेलिब्रेटींच्या घरच्या गणपतीचीही चर्चा असतेच. गणेशोत्सवाचे दहा दिवस गणपती बसवणं शक्य नसलं तरी बरेच कलाकार किमान दीड दिवसाचा तरी गणपती बसवतातच. कलेच्या या देवतेवर सगळ्याच कलाकारांची श्रद्धा आहे. त्यामुळे वर्षातून एकदा होणारे बाप्पाचे आगमन फार भक्तिभावाने साजरे केले जाते. असाच एक सेलिब्रेटी आहे ज्याच्या घरच्या गणपतीची आणि त्याच्या गणपती भक्तीची चर्चा नेहमीच सगळ्या बॉलिवूड मध्ये असते.

सलमान खान. हा बॉलिवूड अभिनेता आपल्या गणपती भक्ती साठी खूप प्रसिद्ध आहे. एखाद्या देवतेवर भक्ती असेल तर जात, धर्म, पंथ आडवे येत नाहीत याचेच हे एक उदाहरण. दरवर्षी सलमान खान वाजतगाजत आपल्या घरी बाप्पाला घेऊन येतो. तो कामात कितीही व्यस्त असला तरी बाप्पासाठी तो आवर्जून वेळ काढतो. आजपर्यंत असे कधीच झाले नाही, की सलमानने आपल्या घरी गणपती आणला नाही किंवा तो गणेशोत्सवासाठी घरी नाही. यावर्षी मात्र सलमानला हा गणेशोत्सव साजरा करता आला नाहीये.

हो मंडळी, यावर्षी सलमानला आपल्या घरच्या गणपतीसाठी घरी जाता आलेले नाही. सलमानच्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो. मात्र यावर्षी थोडा वेळ देखील सलमान गणपतीसाठी घरी जाऊ शकलेला नाही. त्याला कारणही तसेच घडले आहे. सलमान सध्या भारतात नाहीये. आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तो सध्या ऑस्ट्रेलिया मध्ये आहे. सलमानचा नवीन चित्रपट ‘टायगर ३’ येऊ घातला आहे. या चित्रपटाच्या शूटिंग मध्येच तो सध्या व्यस्त आहे.

‘टायगर’ फिल्म सिरीज मधला ‘टायगर ३’ हा तिसरा चित्रपट आहे. या आधी त्याचे ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर बराच गल्ला जमवला होता. सलमानच्या चाहत्यांसाठी हे दोन चित्रपट म्हणजे पर्वणीच होती.

आता हा तिसरा चित्रपट देखील असाच यशस्वी होईल, असे वाटते. नुकताच सलमानचा ‘टायगर ३’ मधील लूक प्रसिद्ध झाला. यात त्याचे लांब वाढलेले तपकिरी केस आणि दाढी फारच प्रसिद्ध झाली आहे. या प्रोमो पोस्टर मध्ये त्याच्याबरोबर त्याच्या भावाचा म्हणजेच सोहेल खानचा मुलगा निर्वाण खानही दिसत आहे.

या चित्रपटात सलमान खानबरोबर अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता इमरान हाश्मी देखील असणार आहेत. ‘टायगर ३’ २०२२ मध्ये प्रदर्शित होईल. २०२२ मधील हा सर्वांत मोठा चित्रपट असणार आहे, असे बोलले जाते.

You might also like