एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मालिका तर संपली… पण या प्रश्नांची उत्तरं कोण देणार?

१५ ऑगस्ट ला सर्वांची लाडकी आणि लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ संपली. रविवारच्या या शेवटच्या भागात अनेक गोष्टी घडल्या. दोन तासांचा हा विशेष भाग प्रेक्षकांना अनेक धक्के देऊन गेला. पण त्याच वेळी त्यांच्यासाठी अनेक प्रश्नही सोडून गेला.

या शेवटच्या भागाचे प्रोमो दाखवताना त्यात डॉ. अजित कुमार उर्फ देवीसिंगला शिक्षा झालेली दाखवण्यात आली होती. प्रोमो मध्ये त्याला त्याच्या कुकर्मांची फळं मिळणार, असं दाखवण्यात आलं होतं. देवीसिंग स्वतःहून आपल्या गुन्ह्यांची कबुली देताना एका प्रोमो मध्ये दाखवण्यात आलं होतं, त्यामुळे त्याला फाशी देताना दाखवण्यात आलं होतं. प्रत्यक्ष एपिसोड प्रसारीत झाल्यानंतर मात्र यातलं काहीच दाखवलं नसल्याने प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडले आहेत.

मालिकेच्या शेवटच्या भागात घडलेल्या काही प्रसंगांनी प्रेक्षकांना बुचकळ्यात पाडले आहे. देवीसिंगने अनेक बायकांना आपल्या नादाला लावून त्यांना लुबाडले आहे. अनेक जणींचे खूनही केले आहेत. एसीपी दिव्या सिंग त्याला कोर्टात नेण्यात यशस्वी देखील झाली होती. मात्र आपल्या हुशारीने देवीसिंग सगळ्या आरोपातून मुक्त होतो. त्यामुळे त्याला शिक्षा व्हावी असे प्रेक्षकांना वाटत होते. शेवटच्या भागात तरी त्याला शिक्षा होताना दाखवतील, असा प्रेक्षकांचा अंदाज होता. देवीसिंगला मरताना दाखवले, मात्र तो प्रत्यक्षात मेलाच नाही. त्यामुळे आता मालिकेचा पुढचा भाग येणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

प्रेक्षकांना अजूनही काही प्रश्न पडले आहेत. डिंपल कोठे पळून जाते? देवीसिंग जिवंत आहे हे डिंपलला माहीत आहे का? डिंपलचे पुढे काय होणार? देवीसिंग आता पुढे काय करणार? गावकऱ्यांना कधीतरी डॉ. अजित कुमारची खरी ओळख कळेल का? रिंकी भाभीचा खून झालाय हे लोकांना कळेल का? चंदा बरोबर जळणारे दुसरे प्रेत कोणाचे होते? असे अनेक प्रश्न आहेत.

काही प्रेक्षकांना मात्र काही गमतीदार प्रश्न पडले आहेत. ‘एका बुक्कीत’ असा डायलॉग मारणारा बज्या नक्की कुणाला एका बुक्कीत पाडतो? नाम्याचं लग्न आता कुणाबरोबर होणार? असे गमतीदार प्रश्न पडल्याने हे प्रश्न वाचणाऱ्या लोकांना हसू आल्याशिवाय राहिले नाही. त्यामुळे मालिकेच्या आठवणी पुन्हा जाग्या झालेल्या बघायला मिळाल्या.

‘देवमाणूस’ मालिकेबद्दल तुम्हालाही असे काही प्रश्न पडले आहेत का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आमचा हा लेख तुम्हाला आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

You might also like