एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘अजून किती वाढवणार?’ प्रेक्षकांचा सवाल! ‘देवमाणूस’ ची वाढत जाणारी कथा सोशल मीडिया वर ट्रोल…

झी मराठी वाहिनी वरील ‘देवमाणूस’ ही मालिका प्रसारीत होऊ लागल्यापासूनच तिने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. खऱ्या घटनेवर आधारीत ही थ्रिलर सस्पेन्स मालिका प्रेक्षकांना पुन्हा झी मराठी वाहिनीकडे घेऊन आली आहे. सध्या झी मराठी वाहिनीवरील मालिका टीआरपी च्या बाबतीत बराच मार खात असल्याचे दिसत आहे. ‘देवमाणूस’ ने मात्र आपला टीआरपी कायम राखण्यात यश मिळवले आहे.

मालिकेत नव्या नव्या पात्रांचा प्रवेश होतो आणि मालिका एक दरवेळी एका नव्या वळणावर जाऊन पोचते. मालिकेत डॉ. अजितकुमार उर्फ देवीसिंग ला अटक झाली. आता त्याला शिक्षा होऊन मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. मात्र पुराव्यांअभावी देवीसिंगची सुटका झाली आणि नेमकी त्याच वेळी एका नवीन व्यक्तिरेखेने मालिकेत एन्ट्री घेतली.

ही नवीन व्यक्तिरेखा म्हणजे चंदा आहे. सध्या देवीसिंग रहात असलेल्या गावात येण्याआधी त्याने चंदाशी प्रेमाचे नाटक करून तिचे पैसे लुबाडले होते आणि मग तो या गावात आला होता. आता ती चंदा आपले पैसे परत मिळवण्यासाठी देवीसिंगला शोधत आली आहे.

चंदा देवीसिंगच्या मागे पैशाचा तगादा लावते. तिच्याकडे देवीसिंगच्या विरोधात पुरावे असल्याने ती त्याला आपल्या तालावर नाचवत राहते. चंदा नंतर मालिकेत अजून एका पात्राची एन्ट्री झाली आहे. संजना काळे ही अभिनेत्री ही नवीन भूमिका साकारणार आहे. आता या नव्या पात्रांच्या एन्ट्रीमुळे मालिका बंद होणार असल्याच्या बातम्या खोट्या ठरल्या आहेत.

मालिका संपत असताना कोणत्याही नव्या पात्राची एन्ट्री सहसा केली जात नाही. मात्र आता प्रेक्षक या नवीन एन्ट्रीला वैतागले आहेत. गुन्हेगाराला शिक्षा होऊन एक चांगला संदेश देत ही मालिका संपेल असे वाटत असताना दोन नव्या पात्रांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे प्रेक्षक विनाकारण कथा ताणल्याचा आरोप मालिकेवर करत आहेत. अजून किती कथा वाढवणार असा सवाल करत या मालिकेला आता सोशल मीडिया वर ट्रोल केलं जात आहे.

झी मराठी वर १६ ऑगस्ट पासून ‘ती परत आलीये’ ही मालिका रात्री १०:३० ला सुरू होत आहे. त्यामुळे देखील ‘देवमाणूस’ मालिका संपणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता ‘देवमाणूस’ मालिका न संपता केवळ तिची वेळ बदलण्यात येईल असे दिसते. अर्थात प्रेक्षक हनुमानाच्या शेपटीप्रमाणे वाढणाऱ्या ‘देवमाणूस’ च्या कथेने खूष नाहीच आहेत. किमान नवीन येणारी मालिका तरी प्रेक्षकांचा हा रोष घालवू शकेल का ते बघावं लागेल.

You might also like