एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर बीएमसी चा हातोडा! ‘प्रतीक्षा’ बंगल्याला बसणार का दणका?

बच्चन यांनी मुंबईत खरेदी केलेला पहिला बंगला तोडणार बीएमसी!

अमिताभ बच्चन यांनी मुंबईत पहिला बंगला घेतला तोच तो हा ‘प्रतीक्षा’ बंगला. सध्या जरी बच्चन यांचे कुटुंबीय ‘जलसा’ बंगल्यात रहात असले तरी आजही सर्व कुटुंब सेलिब्रेशन साठी ‘प्रतीक्षा’ वर जमतात. मात्र लवकरच या बंगल्यावर बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) कारवाई करण्याची शक्यता आहे. संत ज्ञानेश्वर मार्गाची रुंदी वाढवण्यासाठी या आलिशान बंगल्याचा पुढील भाग तोडावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.

या रस्तारुंदीकरणासंदर्भात २०१७ मध्ये बीएमसी ने त्या भागातील सर्व नागरिकांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर बच्चन यांच्या शेजाऱ्यांनी आपली जमीन देण्याचे मान्य केले होते. त्याप्रमाणे २०१७ मध्ये अतिक्रमित घरे पाडण्यात आली होती. ४५ फूट रुंद असलेल्या या रस्त्यावर बरीच वाहतूक कोंडी होत असल्याने तो ६० फूट करण्याचे ठरले.

यादरम्यान बच्चन आणि त्यांचे शेजारी के. व्ही. सत्यमूर्ती यांच्याकडून मात्र काहीच उत्तर बीएमसी ला मिळाले नाही. अखेरीस २०१९ मध्ये सत्यमूर्तीनी देखील आपली जमीन या रस्तारुंदीकरणासाठी देऊन टाकली आणि त्यामुळे त्यांचा बंगला देखील पाडण्यात आला.

मात्र या दरम्यानच्या काळात बच्चन यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही आणि बीएमसी ने त्यावर अजूनही काही कारवाई केली नसल्याने सत्यमूर्ती यांनी त्यावर बरीच खळबळ माजवली होती. आजपर्यंत बाकी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून केवळ बच्चन यांच्या बंगल्यासमोरील रस्त्याचे काम राहिले आहे. कॉंग्रेसचे नगरसेवक ट्यूलिप मिरांडा यांनी याबाबत के-वेस्ट विभागाला ‘बीएमसी मुद्दाम बंगला पाडण्यास वेळ करत असल्याचे’ पत्र पाठवले आहे.

यात त्यांनी म्हटले आहे, “अमिताभ यांच्या बंगल्याशेजारी राहणाऱ्या सर्व मालमत्ताधारकांकडून जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. हा एकच बंगला उरला आहे. ही बाब शहर सर्वेक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवून, महापालिका केवळ वेळ वाया घालवित आहे. जर या रस्ता रुंदीकरणासाठी जमीन मिळाली नाही तर आम्ही या प्रकरणाची तक्रार लोकायुक्तांकडे करू.”

मिरांडा यांच्या या लेखी तक्रारीला के-वेस्ट विभागाने उत्तर दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की बीएमसी लवकरात लवकर ती जमीन ताब्यात घेणार असून शहर सर्वेक्षण कार्यालयाने जमीन मोजणी करून प्रतीक्षा बंगल्यातील प्लॉटमधून किती जमीन घ्यायची आहे ते सांगावे.

डिसेंबर २०१९ मध्ये प्रतीक्षाच्या सीमांकनासाठी अर्ज करून फी देखील भरण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या संयुक्त सीमांकनात सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की या नकाशामध्ये काही त्रुटी आहेत.

रस्तारुंदीकरणासाठी अजून जवळपास १० फूट जमीन लागणार असून ‘प्रतीक्षा’ ची बाह्य भिंत तोडून ती मिळवता येईल असे म्हटले जाते. अमिताभ यांच्याकडे ‘प्रतीक्षा’, ‘जनक’, ‘वत्स’, ‘जलसा’ आणि ‘अशियाना’ असे एकूण पाच बंगले असून ‘प्रतीक्षा’ ही त्यांची मुंबईतील पहिली संपत्ती आहे.

You might also like