एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बिग बॉस मराठी ३ अपडेट: दादूसच्या ऑर्केस्ट्रामध्ये उत्कर्ष घेणार धमाल उखाणा..

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ आता हळूहळू रंगतदार बनू लागला आहे. ‘बिग बॉस’ च्या घरात येणाऱ्या प्रत्येक दिवशी काही ना काही धमाल पाहायला मिळत आहे. रोजच्या टास्कमध्ये ‘बिग बॉस’ च्या घरातले स्पर्धक खूप हिरीरीने भाग घेत आहेत. त्यांना हे टास्क पूर्ण करताना बघताना प्रेक्षकांचे खूप मनोरंजन होत आहे. चौथ्या दिवशी देखील ‘बिग बॉस’ ने स्पर्धकांना असाच एक धमाल टास्क दिलेला आहे. या टास्क मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी इतर प्रेक्षकांबरोबरच इतर स्पर्धकांचे देखील खूप मनोरंजन केले आहे.

यावेळी ‘बिग बॉस’ च्या घरातील स्पर्धकांना एक वेगळाच टास्क देण्यात आला आहे. ‘बिग बॉस’ च्या घरात रंगणार आहे दादूसचा ऑर्केस्ट्रा. या टास्कचे नाव असणार आहे ‘दादूस ऑर्केस्ट्रा: फॅशन शोभेल तुला’. या टास्कमध्ये दोन महिला आणि दोन पुरुष स्पर्धक वेगळ्याच गेटअप मध्ये पाहायला मिळतील. उत्कर्ष शिंदे आणि विकास पाटील हे साडी नेसून महिलेच्या रुपात मनोरंजन करणार आहेत. तर याउलट सुरेखा कुडची आणि मीनल शाह पुरुषांच्या गेटअप मध्ये पाहायला मिळणार आहेत.

‘दादूस ऑर्केस्ट्रा: फॅशन शोभेल तुला’ या टास्कमध्ये मनोरंजक असे दोन डान्स असणार आहेत. या टास्कमध्ये विकास आणि मीनल ‘हृदयी वसंत फुलताना’ या धमाल गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसतील. तर उत्कर्ष आणि सुरेखा ‘ही पोली साजूक तुपातली’ या गाण्यावर डान्स करत धमाल आणणार आहेत. स्पर्धक देखील हे डान्स परफॉर्मन्स खूप एन्जॉय करताना दिसणार आहेत. यावर कहर म्हणून की काय, उत्कर्ष एक धमाकेदार उखाणा देखील घेणार आहे. त्याच्या या उखाण्यावर ‘बिग बॉस’ च्या घरातील स्पर्धकांची हसता हसता पुरेवाट झाली आहे.

या टास्कमध्ये अजूनही काही धमाल गोष्टी असणार आहेत. ते येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच. ‘बिग बॉस’ च्या घरातील स्पर्धक उत्कर्ष शिंदे आपल्या गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. गाणं गाण्याबरोबरच ते लिहिण्याचं काम देखील उत्कर्ष खूप आनंदाने करतो. त्याची गाण्याची आवड हाच त्याचा ‘बिग बॉस’ च्या घरात प्लस पॉईंट ठरेल, असे त्याला वाटते. ‘बिग बॉस’ च्या घरात राहून आपल्या गाण्यांनी तो प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

video sourece and credit: Rajshri Marathi

मंडळी, तुम्हाला ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ पाहायला आवडतं का? तुमचा यातील आवडता स्पर्धक कोणता? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

You might also like