एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

तुम्हाला माहीत आहे का? बिग बॉस मधील हा स्पर्धक आहे दिग्गज अभिनेते दादा कोंडके यांचा नातू…

कलर्स मराठी वाहिनी वर प्रसारित होत असलेल्या ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ च्या स्पर्धकांबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या रिऍलिटी शो मध्ये जरी प्रत्येक स्पर्धक आपले खरे रंग दाखवत असला तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असते. यातील असाच एक स्पर्धक आहे ज्याची पार्श्वभूमी ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.

‘बिग बॉस मराठी सिझन ३’ मधील इतर स्पर्धकांप्रमाणेच एक स्पर्धक आहे अक्षय वाघमारे. त्याने फत्तेशिकस्त, दोस्तीगिरी, बेधडक, बस स्टॉप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘ती फुलराणी’ मालिकेतही त्याने काम केले आहे. अभिनेता असण्याबरोबरच अक्षय फिटनेस फ्रीक आहे. आपल्या फिटनेस कडे तो विशेष लक्ष देतो.

त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट ला भेट दिल्यास त्याचे अनेक वर्कआऊट व्हिडिओ बघायला मिळतील. आपल्या फिटनेसकडे तो जराही दुर्लक्ष करत नाही. लॉकडाऊनच्या काळातही त्याने आपला बराचसा वेळ पिळदार शरीरयष्टी कमावण्यात घालवला आहे.

पण तुम्हाला हे माहीत आहे का, की अक्षय वाघमारेला अभिनयाचा वारसा त्याच्या घरातूनच लाभला आहे? अक्षय हा प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांचा नातू आहे. ७०-८० च्या दशकांत दादा कोंडकेंनी अनेक चित्रपट केले. हे बहुआयामी व्यक्तिमत्व अभिनयाबरोबरच दिग्दर्शन आणि निर्मितीतही पुढे होतं. आपल्या दुहेरी अर्थाच्या चित्रपटांनी त्यांनी एक काळ गाजवला होता. त्यांच्या चित्रपटांचा स्वतःचा असा एक खास प्रेक्षकवर्ग होता.

दादा कोंडकेंनी एक से बढकर एक अशा तब्बल १६ चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांची खासियत ही होती, की या सगळ्याच चित्रपटांनी रौप्यमहोत्सव साजरा केला. त्यांच्या या पराक्रमाची गिनिज बुक मध्येही नोंद झाली. दादा कोंडकेंची जादू इतकी आहे, की आजही अनेक कलाकार त्यांची नक्कल करून प्रेक्षकांना हसवण्यात यशस्वी ठरले आहेत.

दादा कोंडकेंचा नातू असण्याबरोबरच अक्षय वाघमारे अरुण गवळी यांचा जावई देखील आहे. २०२० मध्ये अक्षयने अरुण गवळी यांची मुलगी योगिताशी लग्नगाठ बांधली. दगडी चाळीतच या दोघांचं लग्न झालं. लॉकडाऊनचे नियम पाळत या लग्नाला केवळ दोघांच्या घरची मंडळी उपस्थित होती.

काय मग मंडळी, बसला ना धक्का अक्षयची पार्श्वभूमी ऐकून? तुम्ही अक्षयचे कोणते चित्रपट पाहिले आहेत? त्यापैकी तुमचे आवडते चित्रपट कोणते? तुमची मते आम्हाला कमेंट्स मध्ये कळवायला विसरू नका.

You might also like