एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सावळजच्या (सांगली) बाळू लोखंडेंची खुर्ची गेली सातासमुद्रापार! सोशल मीडिया वर माजवला हाहाकार..

ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले लंडनच्या मँचेस्टरमधील ऑल्टरिंकम भागात फेरफटका मारत असताना त्यांना एका रेस्टॉरंट बाहेर दिसली एक खुर्ची. त्या लोखंडी खुर्चीवरचं नाव वाचून त्यांनी एक व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडिया वर अपलोड केला. मग काय, झाला की हा व्हिडिओ बघता बघता व्हायरल. काही तासांतच हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला पाहायला मिळाला आहे. नक्की कुणाचं नाव होतं त्या खुर्चीवर?

त्या लोखंडी खुर्चीवर मागे ‘बाळू लोखंडे, सावळज’ असं मराठीत लिहिलेलं नाव होतं! सावळजची ही खुर्ची सात समुद्र ओलांडून तब्बल ७ हजार ६२७ किलोमीटरचा प्रवास करून लंडनच्या एका हॉटेलमध्ये कशी काय बरं गेली असेल? यावर नेटकऱ्यांनी अनेक गमतीशीर तर्कवितर्क लढवायला सुरुवात केली आहे. खरंतर या खुर्चीची एक मनोरंजक कथा आहे.

सामान्य कुटुंबात वाढलेल्या बाळू लोखंडे यांनी साधारण १५ वर्षांपूर्वी स्वतःचा मंडप उभारणी आणि सजावटीचा व्यवसाय सुरू केला. अनेक कार्यक्रमांमध्ये जेवणासाठी टेबल-खुर्च्यांची मागणी होऊ लागली. मग जोडधंदा म्हणून केटरिंगचे साहित्य आणले आणि त्यात होत्या या त्याकाळच्या लोखंडी खुर्च्या. १५ वर्षांपूर्वी त्यांनी कर्नाटकातील हुबळीहून घेतलेल्या या खुर्च्या तब्बल १३ किलो वजनाच्या होत्या.

काळ बदलला. प्लॅस्टिक खुर्च्यांची मागणी वाढू लागली. लोखंडी खुर्च्या हाताळायलाही जड जात असल्याने काही वर्षांपूर्वी त्यांनी सांगलीतील कवठेमहांकाळ येथे १० रुपये किलो दराने त्या भंगारात विकून टाकल्या. यातल्या काही खुर्च्या मात्र आठवण म्हणून त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतल्या. या खुर्च्या पुढे भंगारातून मुंबईत गेल्या. एका परदेशी व्यावसायिकाने दुर्मिळ म्हणून त्या विकत घेतल्या. पुढे या खुर्च्या मँचेस्टरच्या एका रेस्टॉरंट मालकाने विकत घेतल्या. पूर्वीच्या काळातील लोखंड मजबूत असल्यानेच या लोखंडी खुर्च्या रेस्टॉरंट मालकाने विकत घेतल्या होत्या. आता त्याने त्या खुर्च्या ग्राहकांना बसायला ठेवल्या आहेत.

बाळू लोखंडेंची ही खुर्ची लंडनमध्ये पाहिल्यानंतर सुनंदन लेलेंनी लंडनमधूनच बाळू लोखंडेंना फोन लावला. फोनवर त्यांनी सांगितले, की “मँचेस्टरच्या मार्केटमध्ये एका मराठी माणसाचं नाव पाहून मी भारावून गेलो, म्हणून व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर मला राज्यमंत्री विश्वजित कदम, पानी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी माझ्याशी संपर्क केला.” लंडनहून परत आल्यावर सावळजला भेट घ्यायला येणार असल्याचेही यावेळी लेले यांनी फोनवर सांगितले.

You might also like