एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बाजिंद’ म्हंजी काय रं भाऊ? अवघ्या महाराष्ट्राला पडलाय हा प्रश्न…

संध्याकाळी सात ते रात्री साडेअकरा ही वेळ म्हणजे महिलामंडळाच्या हातात टीव्ही चा रिमोट असण्याची वेळ. जरी महिलावर्गावर हा विनोद होत असला तरी आई, आजी टीव्ही लावून बसल्या की घरातले सगळेच टीव्ही समोर आपला फॅमिली टाइम एन्जॉय करताना दिसतात.

अशावेळी जेव्हा एखाद्या नव्या मालिकेचा प्रोमो दाखवण्यात येतो, तेव्हा त्याच्याबद्दल उत्सुकता वाढायला लागते. अशाच एका नव्या मालिकेच्या प्रोमोने वाढवलेली उत्सुकता अगदी गुगल सर्च पर्यंत जाऊन पोचली आहे.

झी मराठी वाहिनी वर सध्या अनेक नवीन मालिका येऊ घातल्या आहेत. त्यातलीच एक आहे ‘मन झालं बाजिंद’. या मालिकेत राया आणि कृष्णाची अनोखी प्रेमकथा बघायला मिळणार आहे. या मालिकेतल्या नव्या चेहऱ्यांची जशी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे, तशीच मालिकेच्या नावाबद्दलदेखील उत्सुकता वाढली आहे.

यातल्या ‘बाजिंद’ शब्दाने लोकांना बुचकळ्यात पाडले आहे. या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी लोक थेट गुगलचा आधार घेत आहेत. ‘बाजिंद अर्थ’, ‘बाजिंदचा अर्थ’, ‘बाजिंद म्हणजे काय’, ‘बाजिंद meaning’ या टर्म्स गुगल सर्च च्या ट्रेंड मध्ये दिसून येत आहेत.

संध्याकाळी साधारण सात ते रात्री साडेअकराच्या दरम्यान हा सर्च वाढलेला दिसतो. रात्री साडेअकरानंतर हा सर्च ग्राफ खाली गेलेला दिसतो, तर परत दुसऱ्या दिवशी सात ते साडेअकरा वाढलेला दिसतो. मालिकांच्या मध्ये जेव्हा जेव्हा जाहिरात लागते, तेव्हा तेव्हा हा सर्च ग्राफ जास्त वर गेल्याचे दिसून येते. तर मंडळी, ‘बाजिंद’ शब्दाचा अर्थ आहे जिद्दी. हा शब्द मालिकेतील नायकासाठी म्हणजेच रायासाठी वापरण्यात आला आहे. रायाची ही भूमिका अभिनेता वैभव चव्हाणने साकारली आहे.

या मालिकेत राया हे पात्र अतिशय जिद्दी दाखवण्यात येणार आहे. परंपरागत व्यवसायाला आपल्या व्यवहारी बुद्धीने भरभराटीला नेणारा, तुझं-माझं न करणारा, कामाचा पसारा खूप मोठा असला तरी प्रेमाची उधळण करणारा असा हा राया असणार आहे. तर दुसरीकडे कृष्णा ही मुख्य भूमिका साकारत आहे अभिनेत्री श्वेता राजन.

कृष्णा आपल्या मामा-मामीच्या घरी खूप लाडात वाढलेली आहे. ती हुशार, सीए होण्याचं स्वप्न पाहणारी, सावरून घेणारी, विचार करून कृती करणारी अशी व्यक्तिरेखा दाखवली आहे. या मालिकेतून वैभव चव्हाण आणि श्वेता राजन प्रथमच मुख्य भूमिकेत काम करणार आहेत. या मालिकेची निर्मिती वाघोबा प्रॉडक्शन द्वारे करण्यात आली आहे. मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केलं आहे.

You might also like