एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘आदिपुरुष’ सिनेमात प्रभास असेल रामाच्या भूमिकेत, तर हा मराठमोळा अभिनेता साकारणार हनुमानाची भूमिका!

‘आदिपुरुष’ चित्रपटाची घोषणा झाली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. हा चित्रपट रामायणावर आधारीत असल्याने आधीच या चित्रपटाबद्दल बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात प्रभास हा मध्यवर्ती भूमिका म्हणजेच भगवान राम यांची भूमिका साकारणार आहे. प्रभासच्या ‘बाहुबली’ चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या चित्रपटात माता सीतेची भूमिका क्रिती सनन साकारणार आहे.

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ (२०२०) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते दिग्दर्शक ओम राऊत यांनी. ‘आदिपुरुष’ च्या दिग्दर्शनाची धुराही आता ओम राऊतच सांभाळणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही एक अत्यंत मानाची गोष्ट आहे. मराठमोळ्या दिग्दर्शकावर इतकी मोठी जबाबदारी पडल्याचे पाहून मराठी प्रेक्षकांना खूपच आनंद झाला आहे आणि या गोष्टीचा त्यांना अभिमानही वाटतो आहे.

या आनंदात भर घालणारी अजून एक गोष्ट घडली आहे. राम आणि सीतेबरोबरच रामायणात अजून एक महत्त्वाची व्यक्तिरेखा होती. ती म्हणजे रामभक्त हनुमानाची. या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी देखील एका मराठमोळ्या अभिनेत्याची निवड झाली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून, तो आहे ‘जय मल्हार’ फेम देवदत्त नागे. होय मंडळी, हनुमानाने जसा द्रोणागिरी पर्वताचा भार उचलला होता, तसा देवदत्त नागे आता हनुमानाच्या भूमिकेचे शिवधनुष्य सांभाळेल. ‘जय मल्हार’ मधील देवदत्तचा अभिनय पाहता तो ही नवी भूमिका लीलया पार पाडेल, असा प्रेक्षकांना विश्वास आहे.

या चित्रपटात रावणाची भूमिका सैफ अली खान करणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेते सनी सिंग साकारणार आहेत. एवढी तगडी स्टारकास्ट पाहून सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली आहे. या चित्रपटाची निर्मिती टी सिरीजचे भूषण कुमार करत आहेत. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होईल असे बोलले जात आहे. रामायणासारखा विषय सांभाळणे अवघड आहे. त्यामुळेच त्यावर येणारा चित्रपट पाहणे अधिक मनोरंजक असणार आहे.

तुमच्यासाठी अशाच काही नव्या चित्रपटांच्या घडामोडी आम्ही नेहमी घेऊन येत असतो. त्यामुळेच मंडळी, अशा मनोरंजक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला वारंवार भेट देत राहा. तसेच देवदत्त नागे या अभिनेत्याला हनुमानाच्या भूमिकेत बघताना तुम्ही काय विचार करता, हेदेखील आम्हाला कमेंट्स मधून कळू द्या. तुमच्या अभिप्रायाची आम्ही नेहमीच वाट बघत असतो. आमचे लेख तुम्हाला आवडल्यास जरूर लाईक करा. तसेच आमचे लेख तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरू नका.

You might also like